कधी विचार केलाय का, की रोज बोलणाऱ्या जवळच्या व्यक्तीचा एक दिवस फोन आला नाही तर मन अस्वस्थ होतं, पण एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला नाही तर काहीच वाटत नाही?
याचं साधं आणि सोपं उत्तर आहे: ‘अपेक्षा’.
जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला संवाद, काळजी आणि आपुलकीची अपेक्षा असते. त्यामुळे जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा मन दुखावतं. पण अनोळखी व्यक्तीकडून आपली कोणतीच अपेक्षा नसल्यामुळे त्याच्या वागण्याचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही.
आपण जिथे जास्त अपेक्षा ठेवतो, तिथेच जास्त दुःख होतं.
आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्यासाठी अमुक गोष्ट करावीच. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा आपल्याला राग येतो. इथे चूक माणसाची नसते, तर आपल्या अपेक्षाच आपल्याला त्रास देतात.
एखादी पोस्ट केल्यावर त्याला किती ‘लाईक्स’ मिळतील ही अपेक्षा जर आपण ठेवली, आणि कमी लाईक्स आल्या तर आपण उदास होतो. पण जर आपण फक्त आनंदासाठी पोस्ट टाकली, तर त्याचा फारसा फरक पडत नाही.
“मी एवढं काम केलंय तर बॉसने माझं कौतुक केलंच पाहिजे” ही अपेक्षा कधीकधी निराशेला कारणीभूत ठरते.
तर आता बघूया आनंदी राहण्याचं गुपित काय?
जर आपल्याला खरंच समाधानी राहायचं असेल, तर लोकांनी बदलण्याची वाट बघण्यापेक्षा आपल्या अपेक्षा कमी करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जेव्हा आपण परिस्थितीचा आणि माणसांचा जसा आहे तसा स्वीकार करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो.
• स्वीकारणे म्हणजे हार मानणे नाही: जे बदलता येत नाही ते स्वीकारणं, हेच स्ट्रॉंग मनाचं लक्षण आहे.
• स्वतःवर लक्ष केंद्रित करा: दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला कसं चांगलं बनवता येईल, यावर भर द्या.
• वास्तव ओळखा: प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडेल असं नसतं. हे स्वीकारलं की मन अधिक शांत राहतं.
लोकांचे स्वभाव बदलणं आपल्या हातात नसतं, पण आपल्या मनाला दिलेली ‘अपेक्षेची’ लगाम मात्र नक्कीच आपल्या हातात असते.
चला, आजपासून अपेक्षा कमी करूया आणि आनंदाचा स्वीकार करूया! ❤️
– अमृता मोरे



