आपण प्रेमाची कल्पना करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तासनतास चालणाऱ्या गप्पा…
लांबलचक मेसेज…रोजचे फोन…”काय करतेस?” आणि “जेवलीस का?” सारखे प्रश्न…
पण खरंच प्रत्येक नात्याला शब्दांची गरज असते का?
कदाचित नाही.
कारण काही माणसं अशी असतात, ज्यांच्यासोबत बसल्यावर बोलण्याची गरजच वाटत नाही. त्यांची उपस्थितीच पुरेशी असते. कधी मित्रांसोबत असा अनुभव आलाय का? दोघे एका गाडीत बसलेले असतात. खिडकीबाहेरचा रस्ता धावत असतो. पण आतमध्ये शांतता असते. तरीही ती शांतता अस्वस्थ करणारी नसते. उलट ती खूप आपली वाटते. जणू काही समोरचा माणूस काही बोलत नसला तरी आपल्याला समजून घेतो आहे. नात्याची खरी परीक्षा तिथेच असते. कारण शब्दांनी तर कोणताही माणूस प्रेम व्यक्त करू शकतो. पण शांततेतही जो तुमच्यासोबत राहतो… तो तुमच्या मनाजवळचा असतो.
साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमाची गोष्टही अशीच काहीशी वेगळी होती. कारण त्या नात्यात खूप गप्पा नव्हत्या… लांबलचक पत्रं नव्हती… तासन् तास फोनवरच्या गप्पा नव्हत्या… उलट, त्यांच्या नात्यात सगळ्यात जास्त होती ती म्हणजे…शांतता. साहिर अनेकदा अमृताच्या घरी यायचे. खुर्चीवर बसायचे. सिगारेट पेटवायचे. आणि मग तासनतास फक्त शांत बसून राहायचे. ना साहिर काही बोलायचे… ना अमृता काही विचारायची… पण गंमत म्हणजे, त्या शांततेत कधीच अवघडलेपणा नव्हता. उलट अमृताला वाटायचं, जणू तिच्याच शांततेचा एक तुकडा तिच्यासमोर येऊन बसला आहे. आजच्या काळात पाच मिनिटं शांतता झाली तरी आपण विचार करायला लागतो… “काय झालं?” “रागावली आहे का?” “मी काही चुकीचं बोललो का?” पण साहिर आणि अमृताच्या नात्यात शांतता म्हणजे दुरावा नव्हता. तीच त्यांची भाषा होती. साहिर सिगारेट ओढत बसायचे. अर्धी सिगारेट ॲशट्रेमध्ये विझवून ते निघून जायचे. आणि अमृता त्या विझलेल्या सिगारेट्स जपून ठेवायची. कारण कधी कधी काही आठवणी वस्तूंमध्ये नसतात… तर त्या व्यक्तीच्या स्पर्शात जिवंत राहतात. अमृताला अनेकदा वाटायचं… साहिरला थांबवावं. त्यांचा हात हातात घ्यावा. खूप काही बोलावं. पण त्या काळाच्या काही मर्यादा होत्या… आणि काही भावना शब्दांपर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. नंतर अमृताने एकदा म्हटलं होतं की, त्यांच्या मध्ये दोन मोठ्या भिंती होत्या. एक म्हणजे शांतता. आणि दुसरी म्हणजे भाषा. अमृता पंजाबीत लिहायची. साहिर उर्दूत. दोघांच्या भावना सारख्याच होत्या… पण त्या व्यक्त करण्याची भाषा वेगळी होती. कदाचित म्हणूनच त्यांच्या मनातलं सगळं एकमेकांपर्यंत कधीच पूर्णपणे पोहोचलं नाही. पण कदाचित प्रत्येक प्रेमकथा पूर्ण व्हावीच असं नसतं. काही नाती पूर्ण होण्यासाठी नसतात… ती फक्त मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमची जिवंत राहण्यासाठी असतात. आणि साहिर आणि अमृताचं नातं कदाचित तसंच होतं. शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलकी असलेलं… आणि संवादापेक्षा उपस्थिती जास्त महत्त्वाची असलेलं. कारण शेवटी… खरं जवळचं नातं तेच असतं, जिथे तुम्ही काहीही न बोलता तासनतास बसू शकता…आणि तरीही वाटतं… आज खूप काही बोलून गेलो.
– अमृता मोरे


