आपण जगतोय की फक्त पुढच्या क्षणाची वाट पाहतोय? एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा…
तुम्ही आत्ता जे करत आहात, त्यात खरंच present आहात का?
चहा पीत असताना उद्याच्या मीटिंगचा विचार सुरू असतो. मुलांशी बोलताना मोबाईलवर आलेल्या मेसेजचा विचार सुरू असतो. ऑफिसमध्ये काम करताना काल कोणीतरी काय बोललं, हे डोक्यात फिरत असतं. आणि रात्री झोपताना…उद्याची चिंता सुरू होते. म्हणजे शरीर वर्तमानात असतं, पण मन मात्र कधी भूतकाळात तर कधी भविष्यकाळात भटकत असतं. मग आपण खरंच जगतोय कधी?
याच प्रश्नाकडे खूप deep पाहायला लावणारं पुस्तक म्हणजे राम दास यांचं Be Here Now.
पैसा, यश…आहे तरीही काहीतरी कमी आहे असे का वाटतं?
राम दास यांचं पूर्वीचं नाव रिचर्ड अल्पर्ट होतं. ते मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. पैसा, नाव आणि प्रतिष्ठा त्यांच्या आयुष्यात होती. पण तरीही आत कुठेतरी एक पोकळी होती. यातून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो… सगळं मिळालं, तरी मन शांत का नसते?
आपल्या आयुष्यातही असंच काहीसं होतं. “माझं स्वतःचं घर झालं की मी आनंदी होईन.” “माझा व्यवसाय ₹1 कोटींचा झाला की मी रिलॅक्स होईन.” “मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं की मी निवांत होईन.” “मला प्रमोशन मिळालं की सगळं ठीक होईल.” पण एक गोष्ट लक्षात घ्या… एक goal पूर्ण झाल्यावर दुसरं goal तयार होतं. एक चिंता संपली की दुसरी सुरू होते. म्हणून प्रश्न हा नाही की आपल्याकडे काय आहे? प्रश्न हा आहे की आपण जे आहे ते अनुभवतोय का?
आपण वर्तमानात नसतोच
समजा तुम्ही कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये बसला आहात. समोर तुमचं आवडतं जेवण आहे. बाजूला तुमची माणसं आहेत. पण डोक्यात विचार सुरू आहे…
“उद्या client ला काय सांगायचं?”
“Payment अजून आले नाही.”
“काल तो माझ्याशी असं का बोलला?”
“पुढच्या महिन्यात काय होईल?”
तुम्ही टेबलवर आहात. पण त्या क्षणात नाही. आणि काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर वाटतं… “कधी मुलं एवढी मोठी झाली कळलंच नाही.” खरं तर वेळ कमी नव्हता. आपली उपस्थिती कमी होती. मनाला थांबवायचं नाही, फक्त पाहायचं.
Be Here Now मधला एक सुंदर विचार म्हणजे आपल्या विचारांशी सतत लढायचं नाही.
विचार येणारच. चिंता असणार. भीती वाटणार. जुन्या आठवणी येणार. पण प्रत्येक विचाराला सत्य मानून त्याच्या मागे धावायची गरज नाही. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा महत्त्वाचा मेसेज पाठवला आणि समोरच्याने reply केला नाही.
लगेच मनात येते, “कदाचित त्याला माझं काम आवडलं नाही.” “कदाचित तो नाराज आहे.” “कदाचित deal मिळणार नाही.”
आता इथे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे त्या विचारांमध्ये अडकत राहणं. दुसरा म्हणजे स्वतःला सांगणं… “हा एक विचार आहे. तो सत्य आहेच असं नाही.” आणि पुन्हा वर्तमानात येणं. हाच awareness आहे.
तुमचं मन तुमचा मालक आहे की तुम्ही मनाचे मालक आहात?
आपण अनेकदा म्हणतो… “माझं मन शांत नसते.” पण कदाचित खरी गोष्ट अशी आहे की आपण मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला लगेच प्रतिक्रिया देतो.
मन म्हणतं, “काळजी कर.” आपण काळजी करतो.
मन म्हणतं, “तुला हे जमणार नाही.” आपण घाबरतो.
मन म्हणतं, “त्याने तुझा अपमान केला.” आपण रागावतो. पण एक क्षण थांबून विचार करा… विचार आला म्हणजे त्यावर action द्यायलाच हवी का?
नाही.
विचार आला की लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. थोडं थांबा, एक दिर्घ श्वास घ्या आणि मग काय करायचं ते ठरवा. कदाचित यालाच मनावर नियंत्रण मिळवण्याची सुरुवात म्हणता येईल.
एक छोटासा प्रयोग करून पाहा
आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं शांत बसा. डोळे बंद करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय, यावर लक्ष द्या. विचार आले तर त्यांना थांबवू नका. फक्त लक्षात घ्या… हा फक्त एक विचार आला आहे. आणि पुन्हा श्वासाकडे या. पहिल्या दिवशी मन खूप भटकेल. कदाचित पाच मिनिटांत पन्नास विचार येतील. काही हरकत नाही. तुमचं काम मन रिकामं करणं नाही. मनाकडे पाहायला शिकणं आहे.
प्रेम करा, पण स्वतःची शांतता गमावू नका
आपल्या दुःखाचं आणखी एक मोठं कारण म्हणजे attachment. एखादी व्यक्ती. एखादं नातं. एखादं पद. एखादी ओळख. एखादं यश. आपण त्यांना इतकं घट्ट पकडून ठेवतो की ते बदललं की आपणही आतून तुटतो. याचा अर्थ नात्यांपासून दूर राहायचं असा नाही. उलट, प्रेम करा. मनापासून करा. पण तुमच्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर देऊ नका. कारण माणसं बदलतात. परिस्थिती बदलते. यश-अपयश येते आणि जाते. भावना बदलतात. आयुष्यात सगळं बदलत राहतं. म्हणून प्रेमात attachment पेक्षा acceptance शिकणं महत्त्वाचं आहे.
जे गेलं ते सोडणं म्हणजे विसरणं नाही. कधी कधी आपण वर्षानुवर्षं एखादी गोष्ट मनात धरून ठेवतो. कोणीतरी केलेला अपमान. एखादं अपयश. तुटलेलं नातं. आपलीच एखादी चूक. आणि पुन्हा पुन्हा तोच प्रसंग मनात आठवत राहतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा… त्या व्यक्तीने किंवा त्या प्रसंगाने एकदा मला दुखावलं. पण मी तेच दुःख रोज पुन्हा का जगतोय?
Letting go म्हणजे जे घडलं ते योग्य होतं असं मानणं नाही. त्याचा अर्थ एवढाच… हे घडलं. मला दुःख झालं. पण आता मी हे दुःख कायम सोबत घेऊन बसणार नाही. कधी कधी माफी समोरच्यासाठी नसते. स्वतःला फ्री करण्यासाठी असते.
शेवटी परत एकच गोष्ट… Be Here Now चा सर्वात साधा आणि कदाचित सर्वात कठीण lesson आहे… आत्ता इथे रहा. जेवताना फक्त जेवा. मुलांशी बोलताना फक्त त्यांच्याशी बोला. काम करताना काम करा. चालताना चालण्याचा अनुभव घ्या. चहा घेताना चहाची चव अनुभवा. आणि जेव्हा मन भविष्याची चिंता करू लागेल किंवा भूतकाळात अडकू लागेल…तेव्हा स्वतःला विचारा, “या क्षणी खरंच काय घडतंय?”
कदाचित तुमच्या लक्षात येईल… ज्या शांततेचा शोध तुम्ही इतकी वर्षं बाहेर घेत होतात, ती शांतता तुमच्या आतच होती. फक्त तुम्ही तिथे उपस्थित नव्हता.
आजपासून एक छोटी सुरुवात करा. आज दिवसभरात फक्त एक काम 100% present राहून करा. मोबाईल बाजूला ठेवा. मल्टीटास्किंग थांबवा. मन भटकलं तर पुन्हा वर्तमानात या. कारण आयुष्य या क्षणात आहे. तुम्ही हे वाचत आहात, हाही तुमच्या आयुष्यातला एक क्षण आहे. तोही पूर्णपणे जगा. Be Here Now.
आणि जर या लेखाने तुम्हाला स्वतःकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला लावले असेल, तर तो एखाद्या अशा व्यक्तीसोबत शेअर करा जिला सध्या सतत overthinking किंवा भविष्याची चिंता त्रास देत आहे.
अशाच विषयांवरचे आणखी लेख वाचण्यासाठी माझा ब्लॉग वाचा.
https://blogs.techsavvyamruta.com/


