कधी असं झालंय का, की एखादी गोष्ट तुमच्या मनात इतकी अडकून बसते की तुम्ही वर्तमानात जगणंच विसरता?
कोणीतरी केलेला अपमान…
अपयशी झालेला व्यवसाय…
तुटलेलं नातं…
किंवा अजून न घडलेल्या गोष्टींची चिंता…
शरीर आजमध्ये असतं, पण मन भूतकाळ आणि भविष्यकाळात भटकत राहतं. आणि याच ठिकाणी आपली energy, आनंद आणि शांतता हरवायला सुरुवात होते. खरं ओझं परिस्थितीचं नसतं, तर त्याला धरून ठेवण्याचं असतं अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपलं दुःख एखाद्या घटनेमुळे आहे. पण वास्तवात पाहिलं तर ती घटना कधीच संपलेली असते. आपण मात्र तिला मनात पुन्हा पुन्हा जगत असतो. जणू एखाद्या जखमेवर पुन्हा पुन्हा हात फिरवून ती भरूच देत नाही.
सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही.
सोडून देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं.
समजा एखाद्या उद्योजकाने नवीन प्रोजेक्टमध्ये मोठी गुंतवणूक केली. पण अपेक्षित यश मिळालं नाही.
दोन मार्ग त्याच्यासमोर आहेत.
पहिला मार्ग: तो सतत विचार करत राहतो…
“मी चूक केली.”
“लोक काय म्हणतील?”
“जर मी तो निर्णय घेतला नसता तर?”
याचा परिणाम असा होतो ….
आत्मविश्वास कमी होतो.
नवीन संधी दिसेनाशा होतात.
ऊर्जा भूतकाळात अडकते.
दुसरा मार्ग: तो त्या अनुभवातून शिकतो, धडा घेतो आणि पुढे जातो.
अपयश विसरत नाही. पण त्याला धरूनही ठेवत नाही. यालाच Letting Go म्हणतात.
आपण का सोडू शकत नाही?
कारण आपल्याला वाटतं की नियंत्रण आपल्या हातात आहे. पण सत्य हे आहे की जीवनातील अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.
लोक काय विचार करतील…
भूतकाळात काय घडलं…
भविष्यात काय होईल…
हे सर्व नियंत्रित करण्याचा प्रयत्न म्हणजे हातात पाणी पकडण्यासारखं आहे. जितकं घट्ट पकडाल, तितकं ते निसटत जाईल.
सोडून देण्यासाठी ३ साध्या सवयी –
१. जे बदलू शकत नाही ते स्वीकारा.
स्वीकार म्हणजे पराभव नाही. तो वास्तवाशी केलेला प्रामाणिक संवाद आहे.
२. स्वतःला प्रश्न विचारा
ही गोष्ट पाच वर्षांनी खरंच इतकी महत्त्वाची असेल का?
बहुतेक वेळा उत्तर “नाही” असतं.
३. वर्तमानात परत या
तुमचं काम, तुमचं कुटुंब, तुमची स्वप्नं…जीवन आत्ता घडतंय. मनाला तिथे आणा.
झाड जुनी पानं गळू देतं म्हणून नवीन पालवी फुटते.
नदी वाहते म्हणून ती स्वच्छ राहते.
निसर्ग आपल्याला रोज शिकवतो की grow करायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्याच लागतात.
कदाचित आज तुमच्या आयुष्यातही अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्ही खूप घट्ट पकडून ठेवली आहे.
स्वतःला एक प्रश्न विचारा…
“ही गोष्ट मला पुढे नेत आहे की मागे ओढत आहे?”
जर उत्तर मागे ओढत आहे असं असेल, तर कदाचित आता ती सोडून देण्याची वेळ आली आहे.
कारण अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी काहीतरी नवीन मिळवायची गरज नसते…
फक्त काहीतरी जुनं सोडायची गरज असते.
तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटतं आता सोडून देण्याची वेळ आली आहे? कमेंटमध्ये एक शब्द लिहा. कदाचित तोच शब्द तुमच्या नव्या सुरुवातीची पहिली पायरी ठरेल.
अमृता मोरे



