काही प्रेमकथा पूर्ण होतात. काही अपूर्ण राहतात. आणि काही प्रेमकथा आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ शिकवून जातात.
अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी आणि इमरोझ यांची कथा ही अशाच कथांपैकी एक आहे.
साहिर अमृताचं पहिलं प्रेम होता. शब्दांच्या पलीकडे जाणारं, शांततेतही जगणारं, पण कधीच पूर्ण न होऊ शकलेलं प्रेम. अमृताच्या मनात साहिर कायम होता. पण तिच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्यासोबत उभा राहिला तो इमरोझ. आणि म्हणूनच कदाचित प्रेमाची सर्वात सुंदर व्याख्या साहिरने लिहिली नसेल… ती इमरोझने जगली. प्रेमात आपण अनेकदा विचार करतो…
“तो माझ्यासाठी काय करतो?”
“ती माझ्यावर किती प्रेम करते?”
“मला माझ्या प्रेमाच्या बदल्यात काय मिळतं?”
पण इमरोझचा प्रश्न वेगळा होता. “मी तिच्यासाठी अजून काय करू शकतो?”
ही दोन वाक्यं दिसायला साधी वाटतात. पण त्यांच्यामध्येच प्रेम आणि निस्वार्थ प्रेम यांच्यातला संपूर्ण फरक दडलेला आहे. अमृता जेव्हा इमरोझच्या स्कूटरवर मागे बसायची, तेव्हा ती त्याच्या पाठीवर बोटांनी एक नाव लिहायची… “साहिर”
विचार करा… ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, तिच्या मनात अजूनही दुसऱ्याचं स्थान आहे. याचा बहुतेकांना त्याचा राग आला असता. मत्सर वाटला असता. कदाचित नातंही तुटलं असतं. पण इमरोझ वेगळा होता. कारण त्याला अमृतावर हक्क गाजवायचा नव्हता. त्याला फक्त तिच्यावर प्रेम करायचं होतं. तो तिच्या मनातून साहिरला काढून टाकण्यासाठी लढला नाही. कारण त्याला माहीत होतं… प्रेम म्हणजे कोणाच्या आठवणी पुसून टाकणं नाही. प्रेम म्हणजे त्या आठवणींसह त्या व्यक्तीला स्वीकारणं. आजच्या काळात आपण प्रेमाला अनेकदा मालकी हक्क समजतो.
“तू फक्त माझी आहेस.” “तू फक्त माझाच आहेस.”
पण प्रेम कधीच मालकी हक्क नसतं. प्रेम म्हणजे स्वीकार. प्रेम म्हणजे विश्वास. आणि प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला तो आहे तसा स्वीकारण्याची तयारी.
अमृताने एकदा म्हटलं होतं,
“साहिर माझ्यासाठी मोकळं आकाश आहे, तर इमरोझ माझ्या घराचं छत आहे.” हे वाक्य जितकं सुंदर आहे, तितकंच deep आहे. आकाश सुंदर असतं. ते प्रेरणा देतं. स्वप्नं देतं. आकाशाकडे पाहून मन भरून येतं. पण पाऊस पडतो तेव्हा आपण आकाशाखाली उभे राहत नाही… आपण छत शोधतो. वादळ येतं तेव्हा आपण आकाशाला हाक मारत नाही… आपण छत शोधतो. थकलेल्या दिवसानंतर विश्रांती घ्यायची असते तेव्हाही आपल्याला छतच लागतं. इमरोझ अमृतासाठी तेच छत होता.
ती लिहित बसायची… तो शांतपणे तिच्यासाठी चहा करून ठेवायचा. ती आजारी पडली… तो तिच्या शेजारी बसून राहायचा. तिला आधार हवा असायचा… तो तिथे असायचा. मोठमोठी प्रेमाची वचनं नव्हती. सोशल मीडियावर पोस्ट नव्हत्या. फक्त उपस्थिती होती. निःशब्द पण कायमची. कदाचित म्हणूनच खरं प्रेम शब्दांपेक्षा कृतींमध्ये जास्त दिसतं.
ते “मी तुझ्यावर प्रेम करतो” म्हणण्यात नसतं.
ते “तू थकली असशील, चहा करून ठेवला आहे” या वाक्यात असतं.
ते महागड्या भेटवस्तूंमध्ये नसतं.
ते तुझा दिवस कसा गेला हे मनापासून विचारणाऱ्या व्यक्तीत असतं.
ते मोठ्या वचनांमध्ये नसतं.
ते कठीण काळात तुमचा हात न सोडणाऱ्या हातात असतं.
कदाचित म्हणूनच आयुष्यात प्रत्येकाला इमरोझ मिळेलच असं नाही. पण आपण मात्र कोणाचं तरी इमरोझ नक्की बनू शकतो. आपल्या आई-वडिलांसाठी. जीवनसाथीसाठी. मुलांसाठी. मित्रांसाठी. किंवा एखाद्या अशा व्यक्तीसाठी, जिला फक्त आपल्या सोबत असण्याची गरज आहे. कारण शेवटी प्रेम म्हणजे कोणाला मिळवणं नाही.
प्रेम म्हणजे…
कोणाच्या आयुष्यात अशी एक जागा बनणं, जिथे त्याला सुरक्षित वाटेल.
जिथे त्याला स्वीकारलं जाईल.
जिथे त्याला स्वतःसारखं राहता येईल.
आणि कदाचित…
खरं प्रेम म्हणजे दुसरं काही नसून, कोणाच्यातरी आयुष्यात शांतपणे, निःशब्दपणे… एक छत बनून राहणं.
– अमृता मोरे


