अपयश म्हणजे शेवट नाही… तो फक्त पुढच्या यशाचा टोल नाका आहे!

“जर आज तुम्ही अपयशी ठरलात, तर याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात… की फक्त तुमची पद्धत चुकीची आहे?”

हा प्रश्न स्वतःला एकदा मनापासून विचारून बघा.

कल्पना करा, तुम्ही कुटुंबासोबत एका सुंदर सहलीला निघाला आहात. रस्त्यात अचानक गाडीचं टायर पंक्चर झाले. आता तुम्ही काय कराल? गाडीत बसून रडत राहाल? “माझं नशीबच खराब आहे!” असं म्हणत गाडी तिथेच सोडून घरी परताल?

की शांतपणे टायर बदलून पुन्हा प्रवास सुरू कराल?

बहुतेकजण दुसरा पर्याय निवडतील. मग आयुष्यात एखादं अपयश आलं की आपण इतके का कोसळतो? कारण आपण समस्येला समस्या म्हणून बघत नाही, तर आपल्या आयडेंटिटीचा भाग बनवतो.

“मीच नालायक आहे.”
“माझ्याकडून काहीच होणार नाही.”
“माझं नशीबच खराब आहे.”

हे वाक्य अपयशापेक्षा जास्त नुकसान करणारं आहे. खरं पाहिलं तर अपयश हे तुमचं Character Certificate नसतं. ते फक्त एक Feedback Report असतं.

अपयशाला भावनिक नाही, तर स्ट्रॅटेजिक पद्धतीने बघा

तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला. सहा महिने मेहनत घेतली, पण अपेक्षित ग्राहकच मिळाले नाहीत. आता दोन मार्ग आहेत.

पहिला…

“बस! हा व्यवसाय माझ्यासाठी नाही.” असे म्हणून सोडून देणे.

आणि दुसरा…

“लोकांनी माझी ऑफर का घेतली नाही? मार्केटिंग कमी पडलं का? योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचलो नाही का? किंमत योग्य होती का?” यावर विचार करणे. 

पहिल्या विचारातून निराशा मिळते. दुसऱ्या विचारातून उत्तर मिळतं. आणि उत्तर मिळालं की पुढचा मार्गही सापडतो.

अपयश हा यशाचा टॅक्स आहे.

आपण जीएसटी भरतो, टोल भरतो, इनकम टॅक्स भरतो… कारण आपल्याला माहिती असतं की काही गोष्टी मिळवण्यासाठी काही किंमत मोजावीच लागते. यशाचीही तशीच किंमत असते. ती म्हणजे अपयश. हा “Failure Tax” प्रत्येकाला भरावा लागतो. फरक एवढाच असतो… कोणी हा टॅक्स हसत भरतो. कोणी रडत भरतो. पण भरावा मात्र सर्वांनाच लागतो.

आज अनेक यशस्वी उद्योजकांची कथा आपण ऐकतो. त्यांच्या पहिल्या आयडिया अनेकदा फसल्या होत्या. अनेक स्टार्टअप्सनी पहिलं प्रॉडक्ट बंद केलं, ग्राहकांचा अभिप्राय ऐकला, हवे ते बदल केले  आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. जर त्यांनी “मी फेल आहे” असं मानलं असतं, तर आज ते यशस्वी नसते. त्यांनी ध्येय बदललं नाही. फक्त स्ट्रॅटेजी बदलली.

तुमच्यात आणि यशात नेमकं अंतर कशाचं आहे?

आपण आता जिथे आहोत तिथून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचताना मध्ये येणारं प्रत्येक अपयश आपल्याला एकच प्रश्न विचारतं…

“आता तुला अजून काय शिकायचं आहे?”

कदाचित…

ज्ञान कमी असेल. कौशल्य कमी असेल. अनुभव कमी असेल. किंवा सवयी बदलण्याची गरज असेल.

अपयश म्हणजे तुम्ही अयोग्य आहात असे नाही.

ते फक्त पुढच्या स्तरावर जाण्यासाठी अजून तयारी बाकी आहे, याची सूचना आहे.

काही लोक म्हणतात…”मी ठरवलंय, मग हेच करणार.” पण प्रश्न असा आहे…

तुम्ही ध्येयाशी प्रामाणिक आहात का, की फक्त जुन्या पद्धतीशी?

जर सतत तोच प्रयत्न करूनही तोच परिणाम मिळत असेल, तर दिशा बदलण्याची वेळ आली आहे.

रस्ता बदला. पद्धत बदला. गरज पडली तर उत्पादन बदला. पण ध्येय सोडू नका.

विजेते कोण असतात?

विजेते ते नसतात जे कधीच पडत नाहीत. विजेते ते असतात जे प्रत्येक वेळी पडल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारतात…”यातून मी काय शिकलो?” आणि मग पुन्हा मैदानात उतरतात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात. तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही. अपयश तुम्हाला संपवण्यासाठी येत नाही. ते तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करण्यासाठी येतं. 

आज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा…

तुमच्या आयुष्यात सध्या कोणतं अपयश तुम्ही भावनिक नजरेतून पाहत आहात?

एकदा त्याकडे स्ट्रॅटेजिक दृष्टीने बघा. कदाचित तिथेच तुमच्या पुढच्या मोठ्या यशाची किल्ली लपलेली असेल.

तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज अपयशामुळे निराश झाली आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे ती पुन्हा उभी राहील. तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा.


– अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta