सिस्टम थिंकिंग: आग विझवू नका,आग लागूच देऊ नका!

कल्पना करा, तुमच्या घरात आग लागलीये आणि तुम्ही ती विझवण्यासाठी जीवाचं रान करून धावपळ करत आहात. आजूबाजूचे लोक तुमचं कौतुक करतील, कारण तुम्ही संकटात धैर्याने लढलात. पण खरा ‘स्मार्ट’ माणूस तो असतो, ज्याच्या घरात कधी आग लागतच नाही!.
आपण आयुष्यात अनेकदा फक्त React करतो, पण जर आपण सिस्टम थिंकिंगचा वापर केला, तर आपण समस्या येण्याआधीच त्या संपवू शकतो.
आज आपण अशा दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात: पॅटर्न रेकग्निशन (Pattern Recognition) आणि प्रॉब्लेम अँटिसिपेशन (Problem Anticipation).
१. पॅटर्न ओळखा आणि ‘गेम’ जिंका :
जे लोक हुशार असतात, ते कोणत्याही घटनेकडे फक्त एक ‘इव्हेंट’ म्हणून बघत नाहीत. ते त्यामागचा पॅटर्न शोधतात. ते स्वतःला विचारतात की, “हे जे काही चाललंय, ते का चाललंय? आणि मी हे पुन्हा Recreate करू शकतो का?”
एखादा खेळाडू खूप चांगला असतो, पण तो चांगला कोच (Coach) असेलच असं नाही. कारण त्याला खेळता येतं, पण त्यामागचे पॅटर्न इतरांना समजावून सांगता येत नाहीत. याउलट, ज्याला सिस्टम थिंकिंग कळते, त्याला सिस्टीमच्या कोणत्या भागावर काम केल्यावर रिझल्ट बदलेल, याची पूर्ण क्लॅरिटी असते. यामुळे तुमची भीती कमी होते आणि तुमचा परिस्थितीवर कंट्रोल येतो.
२. समस्या येण्याआधीच ती ओळखा :
बरेच लोक आग लागल्यावर ती विझवण्याचा प्रयत्न करतात. पण सिस्टम थिंकर आग लागायच्या आधीच्या लक्षणांकडे लक्ष देतात.
आपण सकाळी बागेत अनेक ज्येष्ठ नागरिकांना चालताना बघतो. गमतीची गोष्ट म्हणजे, त्यातले बरेच जण तिथे आवडीने आलेले नसतात, तर डॉक्टरांनी “आता चालला नाहीत तर पुढे काही खरं नाही” अशी तंबी दिल्यावर आलेले असतात. ही झाली ‘आग लागल्यावर विझवण्याची’ कृती. पण जे लोक आधीपासूनच आरोग्याची काळजी घेतात, त्यांना डॉक्टरच्या तंबीची वाट बघावी लागत नाही.
एखादा क्लायंट अचानक ओरडायला लागतो किंवा एखादा चांगला कर्मचारी अचानक राजीनामा देतो. आपल्याला वाटतं हे अचानक झालं, पण तसं नसतं. त्या क्लायंटने किंवा कर्मचाऱ्याने आधी अनेकदा छोटे छोटे संकेत दिलेले असतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
सिस्टम थिंकिंग आपल्याला हे संकेत आधीच ओळखायला शिकवते.
३. ‘मग काय होईल?’ हा प्रश्न विचारा :
आपल्या डोक्यात नेहमी सिमुलेशन (Simulation) चाललं पाहिजे. स्वतःला “यानंतर काय होईल?” असे किमान तीन वेळा प्रश्न विचारा. हे प्रश्न विचारणं म्हणजे नकारात्मक विचार करणं नाही, तर ती तुमची ‘फोरसाईट’ (Foresight) किंवा दूरदृष्टी असते. जेव्हा तुम्ही भविष्यात काय घडू शकतं याचा आधीच विचार करून ‘कॉन्टिजन्सी प्लॅन’ (पर्यायी योजना) तयार ठेवता, तेव्हा तुमच्याकडून कोणत्याही दबावाखाली चुका होत नाहीत.
थोडक्यात सांगायचं तर: सिस्टम थिंकिंगमुळे तुमची भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही संकटावर मात करण्यापेक्षा संकट येऊ नये यासाठी स्वतःला तयार करता.
तुमच्यासाठी आजचा टास्क :
तुमच्या कामात किंवा वैयक्तिक आयुष्यात असा कोणता ‘पॅटर्न’ आहे जो वारंवार घडतोय आणि तुम्हाला त्रास देतोय? तो ओळखा आणि त्यावर आजच काम करायला सुरुवात करा.
कमेंटमध्ये नक्की सांगा, “तुम्ही आज कोणती ‘आग’ लागण्याआधीच विझवणार आहात?”

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta